Thursday, February 23, 2017

"Independence" I mean "स्वतंत्रता"



आपण नेहेमीच स्वतंत्रते बद्द्ल बोलत असतो अथवा ऐकत असतो.. पण नक्की याचा अर्थ कुणाला समजला आहे का?

स्वैराचाराने वागणे, स्वतःचा मनाला येईल तसे बोलून मोकळे होणे आणि त्यामुळे समोरचा दुखावला जातोय कि नाही याची तसदी ही न घेणे हा स्वार्थ आहे, स्वतंत्रता नाही.. हे आपल्या पैकी किती जणांना माहिती आहे? माणूस वयाने लहान असो वा मोठा.. आपली मते समोरच्या व्यक्ती वर लादणे गैर आहे, हे न कळण्या इतके आपण खरंच बावळट आहोत का?

झोपेचं नाटक केलेल्या माणसाला झोपेतून जागं कसं करायचे, हे मला अद्याप उमगले नाहीये.. मला विचारलं तर लिंग, वय, नाती-गोती पेक्षा हि श्रेष्ठ अशी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे "माणुसकी.. " मी वयाने लहान आहे कि मोठा, पैशाने श्रीमंत आहे कि गरीब, ताकदी ने बलवान आहे कि दुबळा या हि पेक्षा मी एक माणूस म्हणून कसा आहे, समोरच्या व्यक्तीला मी माणूस म्हणून वागवतो आहे का, समोरच्या व्यक्तीला ही मन आहे हे मला माहिती आहे का, मला त्या व्यक्ती कडून काहीही फायदा नसताना देखील माझी वागणूक सभ्ह्य आहे का, हे बघणं जास्त महत्वाचे नाहीये? माझा हा निर्णय तुला पटलाय का, तुझे काय मतं आहे, हा संवाद इतका अवघड होऊन का बसलाय? मी खूप विचार करते या सगळ्याचा .. पण एक गोष्टं मात्र नक्की की जसं वयाचा अथवा हुद्द्याचा उपयोग करून समोरचा वर हुकूम गाजवणे चुकीचे आहे तसंच स्वतःला विसरून, स्वतःचे मतं डावलून, स्वतःच्या इच्छा मारून जगणे तितकेच लाजिरवाणे आणि दुबळेपणाचे आहे..

आपण एकदाच जन्माला येतो, परमेश्वरानं दिलेले इतके सुंदर आयुष्य आपण कोणासाठी आणि कसे घालवायचे हे ठरवण्याचा अधिकार आणि समानता सगळ्यांना असायला हवी, त्या हक्काचा उपयोग सगळ्यांना योग्यं त्या जागेवर उपभोगता यावा, हिचं ईश्वराकडे सदिच्छा! 

Friday, February 14, 2014

आपली ही छोटीशी गोष्ट

गोष्ट जी आपल्या सर्वात जवळची असते 
गोष्ट जी आपल्या सर्वात हृदयपाशी असते 
गोष्ट जी असते आपल्या आयुष्यात एकमेव मौल्यवान,
तिलाच तर आपण जपत असतो.. हलव्या आठवणीतून, ओल्या डोळ्यातून, मिटलेल्या पापण्यातून, 
स्पर्श्याच्या शहार्यातून तिलाच तर आपण जपत असतो  क्षणाक्षणात.. 

गोष्ट अशी माझ्या आयुष्यातली तू आहेस.. 
तू आहेस माझ्या सर्वात हृदयपास.. 
तू आहेस माझ्यासाठी सर्वात मौल्यवान.. 
तू आहेस म्हणून मी आहे.. 

आणि म्हणून क्षणाचाही रुसवा मला नकोसा वाटतो, 
भीती वाटते मला की 
मी कधी गमवणार तर नाही ना तुला.. 

हा विचारच मला अस्वस्थ करतो
आणि जाणवते तेव्हा की खरच 
तुझ्याचमुळे 
माझ्या गोष्टीला पूर्णत्व आहे.. 

या आपल्या छोट्याश्या गोष्टीत अशीच, 

शेवटपर्यंत साथ दे!!!!! 

- Manali 

Tuesday, September 24, 2013

चिमुटभर साखर

असेच एक दिवस बसून आयुष्याबद्दल बोलत होतो… तर तो म्हंटला आयुष्यात स्पर्धा हवी ग, सगळेच सोपे असेल तर मग जिंकण्यात तरी काय अर्थ आहे? जसं की जेवण तिखट असेल तरी चालेल पण अळणी नको वाटते…  मी त्याच्या डोळ्यात त्याच्या जीवनाचा अर्थ वाचत होते… आणि तो मात्र एकटक माझ्या कडे बघत उत्तराची वाट पाहत होता … सगळे ऐकून फक्त एकच म्हंटले, हो चालेल ना, तुला जेवण तिखट लागले तर एक चिमुटभर साखर द्यायला मी आहे की!

जवळ येउन त्याने मला एक घट्ट मिठी मारली आणि आमच्या आयुष्याची व्याख्या आम्हाला पुन्हा एकदा उमगली …! 

Tuesday, July 2, 2013

काळोख..!




कशाच्या तरी आवाजाने तंद्री तून बाहेर पडले तर आजुबाजूला अंधार होता, नजर जाईस्तोवर फक्त काळोख.. अंधाराचेच साम्राज जणू! जीव गुदमरत होता, श्वास जड झाला होता, कुणा कसल्या आवाजाने मन बैचेन होत होते, एका प्रकाशच्या किरणेसाठी दूर वर धावत होत. कशाच्यातरी  शोधा मध्ये मी फक्त चालत होते, तहान, भूक, झोप या कसल्याच गरजा त्या क्षणाला जाणवत नव्हत्या, समोर होता तो फक्त काळोख.. काही तरी होत त्या जागेत, ती जागा मला नवीन नव्हती, जणू मी या  आधी इथे येउन गेले असावे कदाचित!

पण का कोण जाणे त्या जागेत एक अपार दुःख होते, मी एक एक पाऊल पुढे टाकत होते तसं ते  दुःख अधिकाधिक खोल जात होते.. अनेक वर्षापूर्वीची जखम जशी ठसठसत राहते तशी काहीतरी वेदना असावी.. कुठे होते मी, काय  करत होते, काहीच कळत नव्हते, विचार करून करून डोक्याचा भुगा झाला पण जागेचा आणि माझा संबंध काही नाही लागला..

दूर एका टोकाला रडण्याचा आवाज येत होता, कोणीतरी ओक्साबोक्शी रडत असावे, माझी  उस्तुकता  पराकोटीला गेली, कोण आहे ते का रडतेय असे, अशा प्रश्नांनी मनात गोंधळ घातला, आवाजाच्या दिशेने मी चालत गेले, एक मुलगी खाली मान घालून एकटीच रडत होती, पाऊल भरा भरा तिच्या दिशेने चालत होती, तिच्या जवळ पोहोचले आणि पुन्हा तेच दुःख जाणवले, मनात पुन्हा एक कळ  येउन गेली, डोळ्यात आपोआप पाणी दाटले, मला काय होतेय हे मला समजतच नव्हते, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिने मान वर करून माझ्याकडे बघितले..

तो क्षण मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही, ती भीती होती कि भुताटकी, ते माझे स्वप्न होते कि माझा वेडेपणा, तो एक भास होता कि एक भयंकर सत्य याचा उलगडा करणे अशक्य होते .. ती मुलगी  अजून दुसरी तिसरी कोणीही नसून मी च होते, तो चेहेरा माझा होता, ते दुःख माझे होते, त्या वेदना  मला सतावत होत्या.. काळजाचा ठोका चुकणे काय असते हे त्या क्षणाला अनुभवलं.. धक्का  बसताच  दोन पाऊले मागे गेले तर भिंती ओल्या होत्या, हाताला काही तरी लागले म्हणून मी चमकून पाहिलं तर ते पाणी नसून चक्क रक्त होते.. त्या भिंती स्थिर नव्हत्या.. तिथे एक विचित्र कंपन होते . आता मात्र मला माझाशीच बोलायचे  होते, मला स्वतालाच विचारायचे होते कि मी इथे काय करतेय, मी का रडतेय, का आहेत आयुष्यात  या वेदना, का आहे हा काळोख, का हे दुःख, का हे अश्रू.. थरथर कापणाऱ्या ओठातून केवळ 3 शब्द निघाले, "काय आहे हे?"

आणि समोर बसलेल्या माझा मनाने आवाज दिला, अग वेडे, हे तर मन आहे तुझे ..........! 

Monday, December 31, 2012

देहाशिवाय...

आयुष्यात ना मला एकदा माझ्या देहाशिवाय जगायचंय .. 
मी तुझ्याबरोबर नसून सुद्धा गुप्त रूपाने तुझ्या बरोबर फिरायचय .. 

सकाळी तुझ्या नकळत, हळुवारपणे तुझी झोप मोडायाचीये,   
तुझ्या डोक्यावरून हात फिरवत एक सुंदर सकाळ अनुभवायचीये, 

तुझ्या पहिल्या चहाच्या घोटामध्ये अलगद तुझ्या ओठावर येउन बसायचंय
तर आंघोळी नंतर पापण्यामध्ये साचून राहिलेला पाण्याचा थेंब बनून राहायचंय

स्वतःला आरश्यात बघून निरखत असशील, तर तुला मन भरून बघायचंय
घरातून निघताना देवासमोर हात जोडशील, तर त्या प्रार्थनेमध्ये ही जगायचंय,  

दिवसभर तुझ्या सोबत तुझी सावली बनून फिरायचंय
काळोख झाला कि तुझ्या सोबतीनेच आपल्या घरी परतायचंय, 

पण हे असं सगळे माझ्या मनाला आज का म्हणून करायचंय, 
आणि या प्रश्नाचे उत्तर मात्र माझ्या मनालाही नाही द्यायचंय, 

मी नसताना तू माझा विचार करतोस का, कदाचित हे मला तपासून पहायचंय, 
माझ्या आठवणी मध्ये तू ही हरवून जातोस, हे सुख मनसोक्त उपभोगायचं..! 

Saturday, October 20, 2012

कलयुगातले रामायण

आशुतोष गोवारीकर चा 'स्वदेस' हा माझा आवडता picure आणि त्यातले दसऱ्याच्या दिवशीचे ते 'पल पल हैं भारी' हे गीत तर सगळ्यात favorite.. रावणाने पळवून आणल्या नंतर रामाची वाट पाहत असलेल्या सीतेच्या मनातल्या भावना अतिशय सुंदर रीतीने मांडल्या आहेत जावेद अख्तर साहेबांनी.. आज दिवसभर ते गीत माझ्या ओठांवर गुणगुणत होते, त्यातला एक एक शब्द जसा मनाला स्पर्श करून जात होता.. लहानपणापासूनच रामायण हा आवडता विषय, दूरदर्शन वर येणारी मालिका म्हणजे एकदम 'not to miss show' असायचा. history मध्ये पण हेच शिकले, राम देव होता, सीता त्याची बायको जिने पत्नी धर्म निभावला आणि लक्ष्मणाने लहान भावाचे कर्तव्य पार पडले, पण जशी जशी मोठी होत गेले तसं तसं समजत गेले की जे घडले ते योग्य नव्हते, सगळ्या बाजूंनी विचार केला तर आज हि किती तरी प्रश्नांची उत्तरे मिळतच नाहीत..


आपल्या वडिलांनी दिलेले वचन पाळले जावे म्हणून रामाने एक आदर्श मुलगा म्हणून वनवासात जायला होकार दिला, भाऊ लक्ष्मणाने बंधुधर्म दाखविला आणि मग ते महान झाले, देवाच्या स्थानी जाऊन पोहोचले, इथेपर्यंत गोष्टी पटतात कदाचित,पण खर तर सीतेच्या बलिदानाचे कौतुक राम आणि लक्ष्मणापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे.. तो वनवास रामाच्या नशिबाचा भाग होता, पण आपण ही आता त्याच्या बरोबर जोडले गेले आहोत, ही आपलीही परीक्षा आहे हे स्वीकारून तिने रामाची साथ दिली.. तिचे अपहरण हा तिचा दोष नव्हता, रामाने युद्ध केले हा त्याचा संसार धर्म होता, अग्नीसमोर ७ फेरे घेऊन आपल्या पत्नीचे संरक्षण करण्याचे वचन होते जे त्याने पाळले, पण युद्ध जिंकून परत आणल्यानंतर अग्नी परीक्षा देऊनही त्या देवी सीतेच्या नशिबात सुख नव्हते.. इतिहासात कदाचित राम एक महान राजा असेलही, पण एका धोब्याचे बोलणे ऐकून आपल्या पत्नीने दिलेले सर्व बलिदान विसरून, तिला आपल्या आयुष्यातून दूर फेकून देणारा पुरुष माझ्यासाठी कधीच देवाच्या स्थानी असू शकत नाही. शेवटी तो ही एक अत्यंत सर्व साधारण मनुष्य निघाला, ज्याने आपली पत्नी आता पवित्र राहिली नाही या संशयाखाली हे पाउल उचलले, हेच सत्य आहे! कारण काहीही असो, पण सीतेबरोबर जे घडले तो अन्याय होता, ते पाप होते.. का त्या धोब्याची जीभ हासडून टाकून पूर्ण जगाला एक शिकवण नाही देऊ शकला राम? तो तर राजा होता ना, सहज शक्य होते त्याला हे.. पण कुठे तरी त्याच्या हि मनात असेलच ते शंकेच भूत, एक जीभ हासडली तर अजून १०० वळवळत परत येतील, त्या पेक्षा तिला सोडून देणे योग्य.. धर्म राहिला, तो महान झाला, देव बनला! सीतेची काळजी कशाला आणि कोणाला? सगळे आयुष्य त्याग करून वनवासात जायचे धाडस दाखवेल्या स्त्रीच्या वाटेला काय आले, दुःख, दारिद्र्य, एकटेपणा, अपवित्रता आणि २ बाळांची जबाबदारी? आणि एवढे सगळे होऊन सुद्धा राम देव झाला
आणि  स्त्री जातच युद्धाला जबाबदार असते ही म्हण मराठी मध्ये रूढ झाली, याची मला भारी गम्मत वाटते.. युगानुयुग आपण हे सत्य मानतोय आणि आपल्या पुढच्या पिढीलाही हेच शिकवतोय..

नैसर्गिक रित्या जरी स्त्री बाळाला जन्म देत असली तरी ही जबाबदारी दोघांची असते, संसार दोघांचा असतो, प्रेम दोघांचे असते! कोणी एक अश्या पद्धतीने ते अर्धवट सोडून जाणे चुकीचे आहे, हा त्या दुसऱ्या व्यक्ती वर अन्याय आहे. माझ्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे, इथे आजही स्त्रीवर सर्रासपणे अन्याय होतो, तिच्या भावनांना अगदी सहजपणे लाथाडले जाते, तिच्या बलिदानाला तिचे कर्तव्य समजले जाते.. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे! मला सगळ्यात जास्ती दुःख तर त्या लक्ष्मणाच्या पत्नीसाठी वाटते, तिचा काय दोष होता? तिने १४ वर्ष का म्हणून पती विरह सहन केला? का?? इतिहासात तर त्या बिचारीचे नावही नाहीये कुठे.. स्त्रीला consider करणे बंद केले गेले पाहिजे, ती एक स्वतंत्र्य व्यक्तिमत्व आहे हे विसरून चालता कामा नये..


आजही आपल्या सारख्या घरांमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात या गोष्टी चालूच असतात, रोजच्या रोज ती स्त्री कधी मुलगी बनून, कधी बायको तर नंतर आई बनून स्वतःच्या आनंदाचा बळी देत असते.. हा imbalance थांबायला हवा, तिलाही त्या प्रत्येक आनंदाचा तितकाच अधिकार आहे जितका एका पुरुषाला आहे, थोडा जास्तीच पण कमी निश्तितच नाहीये.. आई वडिलांची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही, पण एका पत्नीचे स्थान ही आयुष्यात खूप महत्वाचे आहे हे कुठल्याही पुरुषाने विसरून जाता कामा नये, त्याच्या आयुष्याची खरी दोर त्या बायकोच्याच हातात असते, त्याच्या संसाराचा, वंशाचा, मुलाबाळांचा रथ तीच चालवत असते, पुढे नेत असते, कुठलीही अपेक्षा न ठेवता..


माझ्या मते, राम बनून जगण्यापेक्षा एक माणूस म्हणून जगला आणि आपल्या पत्नीला खऱ्या अर्थाने अर्धांगिनी बनवून जगवले तर तो खरा पुरुष... ते प्रेम आणि तो त्यांचा सुखाचा संसार..!

Sunday, October 14, 2012

काल आज आणि उद्या



२०१२ मधला आज -- सगळे काही रोज चा रोज चालू असते.. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात, आपल्या गुंतागुंती मध्ये अडकलेला असतो.. मग या 'so called busy life' मध्ये एखादे email, SMS आला की एकदम मस्त वाटते, वाढदिवसाला phone calls, new year, diwali ला messages हे सगळे आज routine झाले आहे! सगळे जण या साठी OK आहेत.  थोडक्यात, आपल्या रोज चा कटकटी मध्ये कोणालाच वेळ नाहीये एकमेकांसाठी.. बस आहेत तर 'excuses'... busy असल्याची, office मध्ये कामा चे pressures असल्याची, तब्बेत बरी नसल्याची, काय करू ग आज काल वेळच मिळत नाही, दिवस कसा येतो आणि जातो कळतच नाही मला.. बघ ना .... ही असली वाक्य आपल्याला नेहेमी ऐकायला मिळतात.. आपण ही खूप मोठ्या मनाने ते समजून घेऊन "Its okay yaar, I can understand, माझे ही same life चालूये" असं म्हणून त्या कारणांना पाठींबा देतो.. कुठे तरी आपण ही असेच वागतो ही जाणीव, ही भीती, हे दुख प्रत्येकाला मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असतच कदाचित! 

परिवार, नाती गोती.. आपली माणसे आणि त्यांच्या साठी वाटणारा तो जिव्हाळा नाहीये असं मी म्हणत नाही. पण त्या रोजचा busy life मध्ये तो जिव्हाळा हरवलाय, ते प्रेम कुठे तरी जाऊन अडकलंय, कमी पडतंय.. आजच्या MNC मधल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या, लाखो रुपयांचे गाडी बंगले, weekend planning  या सगळ्या मध्ये आपण काही तरी विसरतोय, काही तरी रोज च्या रोज हरवतोय हे आपल्या लक्षात ही येत नाही..  

तसं पाहायल गेले तर मी ही याचं 2012 मधली एक मुलगी.. या सगळ्या पेक्षा काही खूप वेगळी  नाहीये  माझी कथा .. पण एवढ्यातच आमच्या घरी एक प्रसंग घडला आणि मग हळू हळू या सगळ्या गोष्टी, या मागचे प्रोब्लेम्स माझ्या लक्षात येऊ लागले.. आमचे सगळ्यात मोठे बंधुराज, त्यांच्या परिवार सहित, म्हणजे त्याची बायको आणि मुलगी - office  च्या  कामा निम्मित ३ वर्षां करिता Germany ला shift झाले..  आमचा दादा जाणार आहे, हे आम्हा सगळ्यांना किमान ६ महिन्यांपासून माहिती होते, कुठे तरी २ दिवस छान निवांत जाऊयात, एक मस्त family get together करूयात, अस 50 वेळा बोलले गेले, पण as I said, 'so called busy life' मध्ये कोणालाच ते जमले नाही.. आणि मग त्यांची जायची वेळ आली तेव्हा त्या शेवटच्या आठवड्यामध्ये या सगळ्या गोष्टी realize होऊ लागल्या.. आपल्या अत्यंत जवळचे माणूस आपल्या पासून खूप दूर जातंय, हे जस जस जाणवायला लागले, तसा तसा अधिकच त्रास होऊ लागला. त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सगळेच प्रार्थना करते होते, पण मनातल्या मनात प्रत्येकाला ते आपल्या पासून दूर जाता आहेत हे सलत होते.. मग तो दिवस आला, सामानाची बांधाबांध झाली, मित्र आप्तेष्ट नातेवाईक यांच्या गाठी भेटी झाल्या.. airport पर्यंत सोडायला गेलो, bye, will miss you, stay in touch, internet, phone calls etc etc असे सगळे promises करत त्यांचा निरोप घेतला.. पाणावलेले डोळे आणि मनात त्यांच्या आठवणी घेऊन आम्ही घरी परतलो..  

मग अचानक Gmail, Facebook, Whatsapp हे सगळे खूप महत्वाचे वाटायला लागले.. एका सकाळी तर चक्क हातामधले काम सोडून मी 'Viber' download करायला  घेतले..  . आपण एकमेकेना किती miss करतोय,  हे दाखवण्याचे आटोकाट प्रयत्न चालू होते..  शांतपणे बसून या सगळ्याचा विचार केला आणि स्वताच्या मूर्खपणावर मला स्वतालाच हसू आले ..  आज ते दूर गेले मग अचानक पणे connectivity  इतकी गरजेची का भासू लागली? हाकेच्या अंतरावर राहत होतो, तेव्हा ही माया कुठे गेली होती? एखाद्या व्यक्तीची खरी किंमत कळायची असेल, तर त्या व्यक्तीने आपल्या पासून दूर गेलेचं पाहिजे का? असे प्रश्न दिवसभर माझ्या मनाला सतावत होते..

खर उत्तर मिळालाय की नाही, हे पक्कं नाही सांगता येणार.. पण एवढे नक्की सांगेन की आज मध्ये जगा, वर्तमान खूप सुंदर आहे, तो तुमचा आहे आणि अर्थातच तुमच्या हातात आहे.. जे होऊन गेले ते नक्कीच बदलता येणार नाही आणि पुढे काय होणार हे नियतीने अजून सांगितले नाही.. मग आज आपल्या आयुष्यातून वेळ काढून दुसऱ्यांसाठी जगा.. ज्यांच्या वर मनापासून प्रेम करता त्यांना नक्की सांगा, एखाद्या संध्याकाळी आपल्या जिवलगाला सहजच काहीही कारण नसताना भेटायला जा, तुझी आठवण आली मग आले तुला भेटायला, अस म्हणून तर बघा .. त्या व्यक्तीच्या डोळ्यात दिसणारा आनंद तुम्हाला जगात कुठेच सापडणार नाही... कधी तरी एखादे गाणे गुणगुणा ज्याने तुम्हाला आनंद मिळेल, चांगले पुस्तक वाचा, तुमची विचारसरणी बदलण्यासाठी ते नक्कीच मदत करेल, college च्या कट्ट्या वर कधी तरी जाऊन बसा, तो wada paav पुन्हा खा, तो cutting चहा पुन्हा order करा.. पहिल्या पाऊसात bike वर बाहेर पडा, कोणालातरी रात्री 12 वाजता birthday cake घेऊन घरी जाऊन wish करा.. माझे आयुष्य तुझ्याविना शक्य नाही, हे त्या एका व्यक्तीला दिवसातून एकदा तरी सांगा ज्यावर तुम्ही स्वताहून जास्ती प्रेम करता, आई बाबा ना picture ची surprise tickets काढून द्या, तुमच्या friends चा party मध्ये  उगाच  एक दिवस त्यानाही involve करा..  रात्री झोपताना त्या परमेश्वराचे आभार माना, उद्याचा दिवस आज पेक्षा ही चांगला जाऊ देत ही अपेक्षा परत मस्त झोपी जा.. 

आज जे आहे त्याची किंमत करा, हे तेच आहे जे तुम्ही कधी काळी देवा कडे मागितले होते, हे तेच आयुष्य आहे ज्याची आज कोणीतरी जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात प्रार्थना करतय.. तुम्ही unique आहात, हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही, निघून गेलेली व्यक्ती तुमच्याकडे परतणार नाही याची जाणीव ठेवा. जे देवाने दिलंय ते  हसत हसत स्वीकारा, भरपूर खा प्या,  मोकळेपणाने खदखदून हसा,  मन भरून जगा.. 

आयुष्य खूप सुंदर आहेच ते अजून सुंदर बनवा.. ! 

- Manali Kulkarni 

About Me

My photo
Nasik-Pune-Mumbai, Maharashtra, India
HR at profession, scorpion, independent, cricket fan, BB lover, dancer, tea addict, shopping freak, talkative..!